केरळामध्ये पुन्हा मुख्यमंत्री विजयन यांची बाजी; कॉंग्रेस संपुष्टात तर, भाजप शून्य!

टिओडी मराठी, थिरुनंतपुरम, दि. 2 मे – केरळ विधानसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री पी. विजयन यांच्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीने राज्यात सलग दुसऱ्यांदा बहुमत मिळवलं आहे. डावी आघाडी व काँग्रेस यांना आलटून पालटून सत्ता देण्याचा क्रम या केरळ राज्यात गेले काही वर्षे सुरू होता. पण, त्याला यावर्षी तेथील जनतेने फाटा देत डाव्या आघाडीच्या हातात पुन्हा सत्ता दिलीय.

कॉंग्रेसला या केरळ राज्यात सक्षम आव्हान उभे करण्यात अपयश आलं आहे. राहुल गांधी याच राज्यातून लोकसभेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे त्यांचा कॉंग्रेसला लाभ होईल, ही अपेक्षाही येथे फोल ठरलीय. काँग्रेसच्या जवळपास दुप्पट जागा डाव्या आघाडीने येथे पटकावल्यात. त्यामुळे हा मुख्यमंत्री विजयन यांच्या नेतृत्वाचा करिष्मा मानला जातोय.

140 सदस्यांच्या विधानसभेमध्ये डाव्या आघाडीला 91 व कॉंग्रेसला 45 जागा मिळाल्या आहेत. मागील विधानसभा निवडणुकीपेक्षा कॉंग्रेसला केवळ तीन जागांची बढत मिळालीय. कॉंग्रेसच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याविषयी रंगलेला वाद, तिकीट वाटपामध्ये झालेला घोळ आणि एकसंधपणे निवडणुकीला सामोरे जाण्यास आलेले अपयश, यामुळे कॉंग्रेसला येथे सत्ता मिळवणे अवघड झाले.

राहुल गांधी यांनी ज्या प्रमाणात येथे प्रचार करणे गरजेचे होते, त्या प्रमाणात त्यांनी येथे लक्ष दिले नाही, हेही एक कारण त्यासाठी मानले जात आहे. केरळ राज्यात भाजपाला एकही जागा मिळविता आली नाही.

त्यामुळे कॉंग्रेसला थेट डाव्या आघाडीशी टक्‍कर द्यावी लागणार होते. मात्र, त्यांना तुलनेत हे आव्हान फार अवघड नव्हते. पण, भविष्यातील राजकारणामध्ये डाव्या आघाडीचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे, असे राजकीय गणित मनाशी बाळगलेली कॉंग्रेस इर्षेने या निवडणुकीच्या राजकारणामध्ये उतरलीच नाही, त्याचा देखील फटका त्यांना बसल्याचे बोलले जात आहे.

मुख्यमंत्री विजयन यांची शांत व धीरोदात्त प्रतिमा तसेच त्यांनी राबवलेले काही प्रभावी सरकारी कार्यक्रम डाव्या आघाडीच्या यशाला कारणीभूत ठरले आहेत. मेट्रोमॅन म्हणून देशभर नावाजलेले ई श्रीधरन यांना पुढे करून भाजपने या राज्यात आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न केला. पण, तो प्रयोग यशस्वी झाला नाही.

Please follow and like us: