पुण्याला पीएम केअर फंडातून दिलेले व्हेंटिलेटर निघाले खराब; अधिकार्‍याने केली पालकमंत्र्यांकडे तक्रार

ऑनलाईन टीम, पुणे – पुणे शहरात सध्या कोरोनाबाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या वाढत्या कोरोनामुळे पुण्यात कोरोना लस, व्हेंटिलेटर्स, रेमडेसिवीर या तीन गोष्टींची कमतरता भासतेय. अशात एक धक्कादायक बाब समोर आलीय. ती म्हणजे, पीएम केअर फंडातून दिलेले 58 व्हेंटिलेटर खराब निघाले आहेत. याबाबत ससून रुग्णालयाचे डिन डॉ. मुरलीधर तांबे यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार केलीय.

पीएम केअर फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर सारखे बंद पडत आहेत, व्हेंटिलेटर पूर्ण क्षमतेनं चालत नाहीत. ते आता धूळ खात पडून आहेत, अशी तक्रार डॉ. मुरलीधर तांबे यांनी पालकमंत्र्यांकडे केलीय.

काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही काल एक पत्रक काढत केंद्र सरकार दुजाभाव करत आहे, अशी टीका केलीय. महाराष्ट्राला  लस देण्यात नव्हे तर कोरोना काळात महत्वाची वैद्यकीय उपकरणे देण्यातसुद्धा केंद्र सरकारने दुजाभाव केलाय, अशी टीका चव्हाण यांनी केली आहे.

या दरम्यान, लोकसभेतील आकडेवारीनुसार गुजरात व उत्तर प्रदेश राज्यामध्ये रुग्णसंख्येच्या व्यस्त पटीने एन 95 मास्क, पीपीई किट्स आणि व्हेंटीलेटर्स केंद्र सरकारने दिलेत, असा हि आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय.

Please follow and like us: