अडवाणी गांधीनगरचे खासदार होते म्हणून भाजपनं माझं 6 वेळा तिकीट कापलं – अमित शहा

ऑनलाईन टीम, नवी दिल्ली, दि. 11 एप्रिल 2021 – सध्या राजकारणात प्रचंड चर्चेत असलेले भाजपचे माजी अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सलग 2 लोकसभा निवडणुकीत भाजपला विजय मिळवून दिलाय. एवढंच नव्हे तर सध्या चालू असलेल्या बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी अमित शहा भाजपचा जोरदार प्रचार करताहेत. मात्र, अडवाणी गांधीनगरचे खासदार होते तेव्हा अमित शहा यांचं तिकीट तब्बल 6 वेळा भाजपने कापलं होतं, असं स्वतः अमित शहा यांनी सांगितलंय.

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उप-पंतप्रधान लालकृष्ण अडवाणी हे गांधीनगरचे खासदार असताना गुजरातमधील भाजपचा बालेकिल्ला असलेल्या गांधीनगर लोकसभा मतदार संघासाठी अमित शहा यांचं तिकीट तब्बल 6 वेळा नाकारण्यात आलं होतं, असं अमित शहा यांनी सांगितलं आहे. तसेच अमित शहा हे अडवाणी यांचे निवडणूक अधिकारी म्हणून काम करत होते. अखेर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत न उभारण्याचा निर्णय अडवाणी यांनी घेतला होता. त्यानंतर भाजपने अमित शहा यांना गांधीनगरमधून लोकसभेची उमेदवारी दिली होती.

हा खुलासा अमित शहा यांनी विधानसभा निवडणुकीत तिकीट कापलेल्या कार्यकर्त्याची समजूत घालताना केलाय. या दरम्यान त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर मागील काही दिवसांत सतत हल्ले झाले आहेत, असंही त्यांनी सांगितलं आहे. आमचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्यावर हल्ला झाला असून त्याबद्दल टीएमसी नेत्यांनी काहीही वक्तव्य केलेलं नाही. तसेच त्यांचं मौन हे हिंसाचार करण्यास पाठिंबा देतंय, असा दावा अमित शहा यांनी केलाय.

अमित शहा सध्या बंगालमध्ये भाजपचा प्रचार करतहेत. या प्रचारामध्ये त्यांनी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केलीय. ममता बॅनर्जी पराभवामुळे बिथरल्या असून त्यांच्या राज्यामध्ये महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय, असं शहा यांनी म्हटलंय.

Please follow and like us: